अनिष न्यूज मीडिया ई-पेपर
आरोग्य

सोनोग्राफीसाठी रुग्णांची फरफट; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नियोजनाचा अभाव

✒️ Anish News Media sindhudurg • 05 November 2026, 01:19 PM

प्रतिनिधी सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी कर्मचारी उपलब्ध नसल्याने सोनोग्राफी होऊ शकली नाही. त्यामुळे रुग्णांना मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी ९.३० वाजता आलेल्या रुग्णांना दुपारी १२ वाजता केवळ ठराविक रुग्णांचीच तपासणी केली जाणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे बांदा व परिसरातून आलेले काही रुग्ण माघारी परतले.


विशेषतः दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना प्रवासाचा त्रास सहन करूनही वेळेत सोनोग्राफीची सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. काही रुग्णांना तपासणीसाठी उपाशीपोटी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.


या प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी वैद्यकीय अधीक्षक व रुग्ण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली. सोनोग्राफी सेवेचे योग्य नियोजन करून रुग्णांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी यांनाही माहिती दिली आहे.


उपजिल्हा रुग्णालय प्रशासन या समस्येवर तातडीने काय उपाययोजना करणार, याकडे आता रुग्णांचे लक्ष लागले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)