अनिष न्यूज मीडिया ई-पेपर
सामाजिक

सावंतवाडी रेल्वे स्थानकात मोकळी जागा असूनही अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईनचे काम रखडले!*

✒️ Anish News Media sindhudurg • 03 November 2026, 08:21 AM


सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ शेजारी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे काम नेमके कधी होणार, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. जागा उपलब्ध असताना विकासकामे रखडण्यामागचे कारण काय? याला जबाबदार कोण? राजकीय लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन की प्रशासकीय उदासीनता? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

सावंतवाडी रेल्वे स्थानक हे कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असून, रेल्वे गाड्यांची संख्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने स्थानकाचा विस्तार होणे गरजेचे आहे. यासाठी अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईन तसेच आवश्यक रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसह रेल्वेप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.




कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्याकडूनही या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला गती मिळताना दिसत नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.




मोकळी जागा उपलब्ध आहे, प्रवाशांची मागणी आहे, संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे; मग अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम नेमके रखडले कुठे? याचे उत्तर रेल्वे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. निदान आता तरी सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या विकासाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून अपूर्ण रेल्वे टर्मिनसचे काम लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)