मळगाव प्रतिनिधी -नितेश तेली
मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जपत नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह प्रेक्षकांना दर्जेदार नाट्यकलेचा आनंद घेता यावा,या उद्देशाने मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने 'पाडवासांज २०२६' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मंगळवार,१० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव-शाळेच्या पटांगणावर तीन दर्जेदार मराठी एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.या नाट्यसोहळ्यात पहिली एकांकिका नाट्यरंभ निर्मित ठाणे यांची 'लागली?' एकांकिका सादर होणार असून, या एकांकिकेचे लेखन प्रथमेश पवार यांनी केले असून साई आणि प्रथमेश यांनी दिग्दर्शन केले आहे आहे. दुसरी एकांकिका 'लगोरी' ही बालनाट्य असून, देवगड येथील युथ फोरम निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन आज्ञा अभिषेक कोयांडे यांनी केले आहे. प्रकाशयोजना अभिषेक कोयांडे, नेपथ्य आकाश सकपाळ आणि संगीत हित्विक धुरी यांनी दिले आहे. तर तिसरी एकांकिका 'खर कोण चुकल' ही इंद्रधनू कलामंच दाभोली निर्मित असून, लेखन पंखज चेंबूरकर आणि दिग्दर्शन सुहास मयेकर यांनी केले आहे. मराठी नाट्यकलेचा आनंद घेण्याबरोबरच कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मळगाव व परिसरातील रसिकांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी,असे आवाहन अष्टविनायक कला क्रीडामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.