आरोस-दांडेली | प्रतिनिधी
इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन एकनाथ राऊळ यांचा ३६वा वाढदिवस श्री माऊली कर्णबधिर विद्यालय, आरोस-दांडेली येथे विद्यार्थ्यांच्या सहवासात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करत, त्यांच्या हावभावांतून संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलविण्याचा आनंददायी उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात नितीन राऊळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत राऊळ यांनीही त्यांच्याशी संवाद साधला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करताना शाळेच्या विविध प्रश्नांसह अनुदानाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात सविस्तर चर्चा करून शाळेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपला पुरेपूर प्रयत्न राहील, असे आश्वासन नितीन राऊळ यांनी व्यवस्थापनाला दिले.
वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत वाटून घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी कास गावचे सरपंच श्री. प्रवीण पंडित, रोणापाल तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुदीन गावडे, श्री. रामचंद्र पालव, निगुडेचे माजी उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे, श्री. देवदास सावंत, श्री. ऐश्वर्य पालव आणि पत्रकार श्री. विश्वनाथ नाईक आदी उपस्थित होते.
